बिडकीन, (प्रतिनिधी) इसरवाडी ते बिडकीन राज्य महामार्ग (२१५) हा रस्ता मागील तीन वर्षापासून मृत्यूचा सापळा बनला आहे. कारण, रस्त्यावर गतिरोधक उभारण्यात आले मात्र कुठेही दर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना नाहक अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावर आजपर्यंत छोटे-मोठे अपघात तर कित्येक जणांचे बळी घेतले आहे. दरम्यान, संबंधीत विभागाने तत्काळ यात लक्ष घालून गतिरोधक दर्शक फलक किंवा इतर काही उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
इसरवाडी ते बिडकीन हा राज्य महामार्ग असून आजरोजी रस्ता चांगला आहे. यामुळे अनेक वाहने
भरधाव जातात. तर लगतच गुरुधानोरा चौफुली गावातून लहान शाळकरी मुले, शेतकरी, महिला, गाडीबैल रोड क्रॉस करावे लागते. अशावेळी एखादे भरधाव वाहन आले तर अपघाताची दाट शक्यता होती. त्या अनुषंगाने रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरकडे शेतकरी कृती समिती अध्यक्ष राहुल ढोलेंसह गावाकऱ्यांनी केली होती.
यानंतर ठेकेदार कल्याण टोल कंपनीस गतिरोधक टाकण्यास परवानगी दिली होती. यामुळे कंपनीचे अधिकारी संबंधित इंजिनिअर गणेश तुपे यांनी जागेची पाहणी करून गावकऱ्यांनी सांगितलेल्या जागेवर गतिरोधक बसवले. परंतु गतिरोधकच्या ठिकाणी दर्शक फलक उभारण्यात आले नाही, यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लागल्याने पाठीमागून वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे गतिरोधकाच्या ठिकाणी तातडीने दर्शक फलक बसवण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. दरम्यान, गतिरोधकाच्या जागी दोन दिवसांत फलक लावण्यात येईल, अशी माहिती कल्याण टोलचे अभियंता गणेश तुपे यांनी दिली. तर हा रस्ता बिडकीन औद्योगिक वसाहतीत जोडणारा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याने वाहतुकीची नेहमी वर्दळ असते. यामुळे दर्शक फलक उभारणे गरजेचे असल्याचे माजी ग्रापं सदस्य गणेश भावले यांनी सांगितले.















